वृत्तसंस्था : तिरुमला तिरुपती देवस्थान येथे प्रसाद म्हणून देण्यात येणारे लाडू सध्या वादात आहेत. आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांच्यावर आरोप केल्यानंतर हा विषय समोर आला. प्रसादासाठी लाडू तयार करताना त्यात जनावरांची चरबी वापरली गेली असल्याचा आरोप झाला. त्यानंतर प्रयोगशाळेत चाचणी केली असता त्यामध्ये प्राण्यांची चरबी, फिश ऑइल आणि बीफ टॅलोचा वापर केला असल्याचा चाचणी अहवाल समोर आला. या अहवालानंतर भाजपा आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षाने जोरदार आरोप करत वायएसआर काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. पण या लाडूमधून मंदिराला किती महसूल मिळतो? लाडूचे अर्थकारण कसे आहे? यावर एक नजर टाकू.
मिळालेल्या माहितीनुसार, तिरुमला तिरुपती देवस्थानकडून दररोज तीन लाख लाडू बनविले जातात. या लाडूच्या विक्रीमधून देवस्थानाला वर्षाकाठी ५०० कोटींचा महसूल मिळतो. देवस्थानात दर्शन घेतल्यावर आणि मंदिराच्या बाहेर अनेक स्टॉल्सवर हे लाडू उपलब्ध असतात. जर व्यवस्थित पॅकिंग केल्यास हे प्रसादाचे लाडू १५ दिवस टिकतात. तिरुपती बालाजी ट्रॅव्हल्सने दिलेल्या माहितीनुसार, तीन आकारमानाच्या प्रकारात लाडू उपलब्ध होतात. लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराचे लाडू मिळतात. त्याचा आकार अनुक्रमे ४० ग्रॅम, १७५ ग्रॅम आणि ७५० ग्रॅम इतका असतो. श्री वेंकटेश्वर मंदिराच्या आतमध्ये छोट्या आकाराचे लाडू भाविकांना प्रसाद म्हणून मोफत वाटले जातात. तर मध्यम आकाराचे लाडू प्रति नग ५० रुपये आणि मोठ्या आकाराचा लाडू प्रति नग २०० रुपयांना विकला जातो.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तिरुपती देवस्थानाच्यावतीनं भक्तांसाठी देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता, असा आरोप केला. यानंतर आंध्र प्रदेशमध्ये आणि तिरुपती देवस्थानच्या भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या काळात तिरुपती देवस्थानाच्या वतीनं भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूंमध्ये शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता, असा आरोप केला. चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या या आरोपामुळे आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला आहे.