देशविदेशभारत

नवनिर्वाचित दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी बाजुला रिकामी खुर्ची ठेवून स्वीकरला पदभार

वृत्तसंस्था : अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी आम आदमी पक्षाने आतिशी मार्लेना यांची एकमुखाने निवड केली होती. त्यानंतर आतिशी यांनी सोमवारी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. दरम्यान, पदभार स्वीकारताना आतिशी यांच्या बाजुला एक रिकामी खुर्ची ठेवण्यात आली. त्यामुळे त्यांच्या कृतीची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री आतिशी यांनी माध्यमांशी बोलताना यामागचं कारणही सांगितलं आहे.

यासंदर्भात बोलताना आतिशी म्हणाल्या, “ज्याप्रमाणे रामायणात भरत यांनी प्रभू श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेऊन १४ वर्ष राज्य केलं, त्याप्रमाणे मीसुद्धा पुढचे चार-पाच महिने सरकार चालवणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या सन्मानार्थ मी हा निर्णय घेतला आहे.” पुढे बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पुन्हा विजय मिळेल अशा विश्वासही व्यक्त केला. “मी केवळ आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री असणार आहे. या निवडणुकीत दिल्लीतील जनता पुन्हा आम आदमी पक्षाला बहुमताने निवडून देईल आणि अरविंद केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होतील”, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, आतिशी यांच्या या निर्णयानंतर भाजपाकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. “हा प्रकार म्हणजे संविधानाचा अपमान आहे. यावरून दिल्लीचे सरकार आतिशी नाही, तर अरविंद केजरीवाल रिमोट कंट्रोलद्वारे चालवतील, हे सिद्ध झालं आहे. हा संविधानाबरोबरच मुख्यमंत्री पदाचाही अपमान आहे“, अशी प्रतिक्रिया दिल्ली भाजपाचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button