वृत्तसंस्था : देशात अनेक ठिकाणी सातत्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण होते. हजारो नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. देशातील दुष्काळ संपूर्णपणे नाहीसा करण्यासाठी केंद्र सरकारने नदीजोड प्रकल्प हातात घेतला आहे. त्याअंतर्गत देशातील अनेक महत्वाच्या आणि मोठ्या नद्या एकमेकांना जोडून, दुशली भागात त्यांचे पाणी वळवणे असा हा प्रकल्प आहे. दरम्यान आता याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी भाष्य केले आहे. भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करावा. देशातील लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढील काही महिन्यांत देशातील २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार, असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती (जलसंसाधन) मंत्री सी. आर. पाटील यांनी केले.
पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवणे आवश्यक आहे. “हर घर जल’ योजनेमुळे महिलांची पाण्यासाठीची भटकंती थांबली. देशातील महिलांचे दररोजचे साडेपाच कोटी तास वाचले. त्या वेळेचा उपयोग आर्थिक स्वावलंबनासाठी होऊ लागला. शुद्ध पाणी घरी आल्यामुळे जलजन्य आजार कमी होऊन औषधावरील खर्च कमी झाला आहे, असे त्यांनी सांगितले. जलसंधारणाच्या अनेक योजनांना गती मिळते आहे. यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्राधान्य देण्यात आले आहे. जगाच्या १८ टक्के लोकसंख्या भारतात आहे. या तुलनेत स्वच्छ व पिण्यालायक पाणी केवळ ४ टक्के उपलब्ध आहे. भविष्यात देशात पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी, यासाठी नद्या एकमेकांशी जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला पुरेसे पाणी उपलब्ध होऊ शकेल, अशा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी सर्वतोपरी कामे सुरू आहेत. यास समाजाचाही पाठिंबा आवश्यक आहे. पुढील काळात प्रत्येक घरावर रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यात येईल. भावी पिढीला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी सर्वांच्याच प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे, असे मतही सी. आर. पाटील यांनी व्यक्त केले आहे.