Chess Olympiad 2024 भारताने रचला इतिहास; पुरुष आणि महिला दोन्ही संघाने जिंकले सुवर्णपदक
वृत्तसंस्था : सध्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा २०२४ सुरू आहे. यामध्ये भारताने मोठा इतिहास घडवला आहे. भारताचा बुद्धिबळपटू डी. गुकेश याने बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ स्पर्धेत इतिहास रचला आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जबरदस्त खेळ करत त्याने भारताला सुवर्णपदक जिंकवून दिले आहे. ४५ व्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या डी. गुकेशने संपूर्ण विश्वात सर्वोत्तम कामगिरीने भारताचे नाव मोठे केले आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या १० व्या फेरीमध्ये भारतीय खेळाडूंनी अमेरिकेचा २.५ – १.५ असा पराभव केला व सुवर्णपदक पटकावले. डी गुकेशने अमेरिकेच्या फॅबियानो कारूआना याचा पराभव केला. डी. गुकेशने या स्पर्धेत एकूण ८ सामने जिंकले तर २ सामने ड्रॉ केले. संपूर्ण स्पर्धेत गुकेशने आणि अन्य खेळाडूंनी चमकदार कामगिरी करून देशाला सुवर्णपदकाची कमाई करून दिली आहे.
बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ स्पर्धेत खुल्या गटामध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. भारतीय संघात डी. गुकेश, आर प्रज्ञानंद, अर्जुन इरीगसी, विदित गुजराथी, पेंटाला हरिकृष्ण, आणि श्रीनाथ नारायणन यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनला अमेरिकेविरुद्ध दोन गुणांचा फटका बसला. त्यानंतर भारताने चमकदार कामगिरी करून सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत प्रत्येक फेरीत दोन संघ एकमेकांविरुद्ध लढत देतात. एका संघाने फेरी जिंकल्यास त्याला दोन गुण मिळतात.
बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ या स्पर्धेत भारताच्या महिला संघाने देखील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. बुद्धिबळ ऑलम्पियाड २०२४ स्पर्धेत भारताच्या महिला संघाने देखील सुवर्ण पदक जिंकले आहे. महिलांच्या संघात वंतिका अगरवाल, दिव्या देशमुख, हरिका द्रौनोवल्ली, वैशाली रमेशबाबू, तानिया सचदेव या खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिला या भारताच्या दोन्ही संघाने सुवर्णपदक जिंकले आहे.