राज्य सरकारचा निर्णय; पुणे विमानतळाचे केले ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज’ नामकरण
पुणे : राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. नोहेंबरच्या सुरूवातीला किंवा शेवटच्या टप्प्यात राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्याआधी राज्य सरकाने अनेक निर्णय घेण्याचा धडाकाच लावला आहे. दरम्यान आज राज्य सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. आज झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने लोहगाव विमानतळाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील लोहगाव विमानतळाचे नामकरण आता ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे करण्यात येणार आहे. लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे. यासंदर्भात राज्य सरकारने प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली होती. त्यावर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे विमानतळाचे नामकरण करण्याच्या मागणीला मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, ”पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आज पडले असून आपण दिलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सदर प्रस्ताव हा कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला असून पुढील प्रक्रियेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव येत्या कॅबिनेटमध्येच मंजूर केला जाईल. या संदर्भातील घोषणा उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी पुण्यात केली होती. मा. देवेंद्रजींनी शब्द पाळत घोषणा केल्यानंतरच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर केला आहे. या संदर्भातील प्रस्तार सादर करताना मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांना भेटून चर्चा केली होती. आपल्या प्रस्तावानंतर काहीच दिवसात हा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला असून त्याबद्दल तिन्ही नेतृत्वाचे मनस्वी अभिनंदन आणि धन्यवाद !
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद़्गुरु संत तुकाराम महाराज यांचं आजोळ होतं. इतकंच नाही तर तुकाराम महाराजांचे बालपण लोहगावमध्ये गेल्याने लोहगाव आणि तुकोबाराय यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळे गावकरी, महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाच्या इच्छेसह हा प्रस्ताव आपण राज्य सरकारकडे दिला होता. शिवाय वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून भागवत धर्माच्या प्रचार, प्रसारात तुकोबारायांनी मोठं योगदान देत समाजाला नवा विचार दिला, जो आजही काल सुसंगत आहे. त्यामुळे तुकोबारायांचं नाव पुण्याच्या आंतराष्ट्रीय विमामतळाला देणे, हे अतिशय संयुक्तिक असल्याची सर्वांचीच भावना आहे. आता राज्य सरकारने मंजूर केलेला हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाणार असून यासंदर्भात केंद्रीय कॅबिनेट लवकरच निर्णय घेईल आणि यासाठी या विषयाचा पाठपुरावा करणार आहे. मला विश्वास आहे, ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल.”
पुण्यात एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील विमानतळाचे नामकरण ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करणार असल्याचे सांगितले होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेचे स्वागत करून फडणवीसांनी याबाबत घोषणा केली होती.