टँकरमधून पेट्रोल चोरी करणाऱ्या ‘ऑइल माफिया’ प्रवीण मडीखांबे टोळीवर मोक्का कारवाई
पुणे : पुण्यासह ग्रामीण भागात ऑईल माफिया प्रवीण मडीखांबे आणि त्याच्या टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्का कारवाई केली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर असलेल्या लोणी काळभोर परिसरातील टँकरमधून पेट्रोल-डिझेल चोरी करण्यात येत होती. त्यामधून कोट्यवधींची माया देखील जमवली होती. या टोळीचा मुख्य सूत्रधार प्रवीण मडीखांबेसह १२ जणांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाईचे आदेश दिले.
मुंढवा आणि लोणी काळभोर भागात पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत चोरलेले ४८ लाख रुपयांचे पेट्रोल, डिझेल व टँकर जप्त केला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी मोक्का कारवाई केली आहे. प्रवीण सिद्राम मडीखांबे (रा. कदम वाकवस्ती, लोणी काळभोर) याच्यासह शुभम सुशील भगत (वय २३, रा. बोरकरवस्ती, थेऊरफाटा, ता. हवेली), तृशांत राजेंद्र सुंभे (वय २३, रा. बँक ऑफ बडोदाजवळ, थेऊरु फाटा) रवी छोटेलाल केवट (वय २५, रा. बोरकरवस्ती, माळीमळा, ता. हवेली), विशाल सुरेश गोसावी (वय ३० रा. वाणीमळा, थेऊर फाटा), कृष्णा उर्फ किरण हरिभाऊ आंबेकर (वय ३१ रा. कदमावाक वस्ती), रोहितकुमार छेदूलाल (वय २५, रा.बोरकरवस्ती, माळीमळा), अभिमान उर्फ सुभाष सुरेश ओव्हाळ (वय ३५, माळीमळा, लोणी काळभोर), पांडुरंग निळकंठ नकाते (वय ४२, रा. माळीमळा, लोणी काळभोर), आकाश सुखदेव घोडके (वय २४, रा. हनुमाननगर, कोथरूड), व तुकाराम वाघमारे (वय २३, रा. श्रावणधारा वसाहत, कोथरूड), तसेच टँकरचालक अशांवर कारवाई केली आहे. मडीखांबे हा पसार असून, त्याचा शोध घेतला जात आहे.
लोणी काळभोर भागात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. तेव्हा पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर फाट्याजवळ पत्र्याच्या खोलीजवळ टँकर थांबला होता. त्यातून डिझेल चोरले जात असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी तेथे छापा टाकला. छापा कारवाईत १ हजार ६२० लिटर डिझेल जप्त केले होते. नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी मडीखांबे आणि साथीदारांवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त आर. राजा यांच्याकडे सादर केला होता. त्यांनी प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे पाठविला. यानंतर पाटील यांनी या टोळीविरोधात मोक्का कारवाई केली.
लोणी काळभोर भागात पेट्रोल-डिझेल कंपन्यांचे आगार आहे. तेथून पेट्रोल-डिझेल टँकरमध्ये भरून वितरित केले जाते. या परिसरातून पश्चिम महाराष्ट्रात देखील पेट्रोल डिझेल पुरवले जाते. प्रवीण मडीखांबे आणि साथीदारांनी टँकरचालकांशी संगनमत करून पेट्रोल-डिझेल चोरीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली. मडीखांबेने या चोरीमधून कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावली आहे. लोणी काळभोर भागात त्याने इमारत बांधली, वाहने देखील खरेदी केल्याचे सांगितले जाते. मोठे लागेबांधे असलेल्या मडीखांबेवर मोक्का कारवाई झाल्याने नागरिकांसह कंपनी चालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.