“नवरा माझा नवसाचा २” ची ट्रेन सुसाट; बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई
तब्बल एकोणीस वर्षानंतर नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा भाग दोन चित्रपटगृहात दाखल झाल्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला पहिल्याच दिवशी भरभरून प्रतिसाद दिला. आपल्या पैकी कित्येक जणांचे बालपण नवरा माझा नवसाच्या या चित्रपटामुळे यादगार झाले आहे. या चित्रपटही एक एक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. एवढेच नाही तर सिनेमाची गाणी सुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळेच जेव्हा या सिनेमाच्या भाग दोनची घोषणा झाली तेव्हा अनेक जणांनी या निर्णयाचे स्वागत केले. दमदार स्टारकास्ट, पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या नवरा माझा नवसाचा २ या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. “नवरा माझा नवसाचा २” चित्रपटाला पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या ओपनिंग्जपैकी आहे. १००० पेक्षा अधिक शोज ने सुरुवात केलेल्या या चित्रपटाला ६०० पेक्षाही अधिक शोज हाऊसफुल्ल झाले होते. वीकेंडला या चित्रपटाने ७.८४ कोटींची कमाई केली आहे. प्रेक्षकांनी पुन्हा एकदा या चित्रपटाला प्रचंड प्रेम दिले आहे.
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवादलेखन संतोष पवार यांनी केले आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्यासह या चित्रपटामध्ये मोठी स्टारकास्ट देखील पाहायला मिळणार आहेत. नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास, त्यात होणाऱ्या गमतीजमती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत असून प्रेक्षकांना हे सरप्राइज पसंतीस पडणार आहे. बऱ्याच दिवसांपासून रसिक प्रेक्षकांमध्ये “नवरा माझा नवसाचा २” हा चित्रपट चर्चेत राहिला आणि याचेच प्रतिबिंब बॉक्स ऑफिसवरही उमटत आहे. चित्रपटावरचं प्रेम प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिसादातून दाखवून दिले आहे. आता येत्या काही दिवसांत हा प्रतिसाद आणखी वाढेल यात शंकाच नाही.