अधिकारी, कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरून काम करावे, अन्यथा कारवाई केली जाईल- आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले
पुणे : शहरातील पावसाळी गटारांची स्वच्छता संबंधित ठेकेदारांकडून करून घ्यावी, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी प्रशासनाला केल्या आहेत. रस्त्यावर पाणी साचल्यास मलनिस्सारण विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरून काम करावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. शहरात दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. जागोजागी पावसाचे पाणी साठल्याने त्यातून वाहने चालविताना वाहनचालकांची तारांबळ उडाली. परिणामी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पावसाळी गटारांमधील कचरा स्वच्छ न केल्याने रस्त्यावरील पाणी वाहून न जाता तसेच राहिल्याच्या तक्रारी थेट महापालिका आयुक्तांकडे करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी संबंधित ठेकेदारांंकडून पुन्हा पावसाळी गटारांची स्वच्छता करून घ्यावी. मोठा पाऊस झाल्यानंतर मलनिस्सारण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून काम करावे, नाहीतर कारवाई होईल, असा इशाराच दिला.
दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी महापालिकेच्या वतीने पावसाळी गटारे, मलवाहिन्यांची स्वच्छता केली जाते. यावर्षी देखील पालिकेने ठेकेदारांमार्फत ही स्वच्छता केली होती. मात्र, त्यानंतर देखील सुरुवातीच्या काळात शहरात पडलेल्या पावसामध्ये अनेक रस्ते जलमय झाल्याचेच चित्र होते. डोंगरावरून रस्त्यावर वाहून येणारे पाणी थांबविण्यासाठी चर देखील खोदण्यात आले होते. मात्र, आता पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात देखील पडत असलेल्या पावसानंतरही रस्त्यांवर सतत पाणी साचत असल्याचे समोर आले आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांना विचारले असता, ते म्हणाले बुधवारी शहरात कमी वेळेत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. शहरातील पावसाळी गटारांच्या वाहिन्यांची क्षमता कमी असल्याने त्यामधून लगेचच पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले. यावेळेत पालिकेचे अधिकारी, कर्मचारी कुठे दिसले नाहीत, याबाबत देखील तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
शहरात दोन दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांना झोडपून काढले. शहरातील जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, आपटे रस्ता, बाणेर रस्ता, नगर रस्ता, पुणे स्टेशन परिसर यांसह शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. साडेतीन ते चार तास नागरिक वाहतूक कोंडीत अडकले होते.