वाढवण बंदर प्रकल्पानंतर पालघर जिल्ह्यात मुरबेच्या रूपाने दुसरा मोठा बंदर प्रकल्प उभारण्यात येणार
पालघर : प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पानंतर पालघर जिल्ह्यात मुरबेच्या रूपाने दुसरा मोठा बंदर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. वाढवण बंदरापासून १५ ते २० किमी अंतरावर मुरबे व नांदगाव या गावांदरम्यान खडकाळ क्षेत्रालगत हे बंदर उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. बंदर उभारणीनंतर या ठिकाणी मध्यम व लहान आकाराच्या जहाजांना नांगरणे शक्य होणार आहे. जिंदाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने उच्छेळी व सातपाटी खाडीदरम्यान मुरबे समुद्र किनाऱ्यासमोरील उथळ खडकाळ क्षेत्रात भराव टाकून बंदर उभारण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार मुरबे येथील प्रस्तावित बंदर हे सातपाटी खाडीच्या लगत राहणार आहे. या प्रकल्पाच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सागरी मंडळाने ३१ ऑक्टोबर २०२३ बैठकीमध्ये मान्यता दिली होती. सर्व प्रकारच्या मालाची आयात, निर्यात करण्याची २५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमता असणाऱ्या या प्रकल्पासाठी ४२५९ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.
हे बंदर सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर उभारण्याचे प्रस्तावित असून आराखडा तयार करणे (डिझाइन), उभारणे (बिल्ड), मालकी (ओन), चालविणे (ऑपरेट) व हस्तांतर( ट्रान्सफर) (डीबीओओटी) तत्त्वावर उभारणी होऊन या संदर्भातील स्विस आव्हान पद्धतीची (swiss challange method) निविदा २१ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. प्राधिकरणाने महिनाभराच्या कालावधीत स्पर्धात्मक निविदा आमंत्रित केल्या असून इच्छुक प्रकल्प प्रवर्तक यांनी बंदर उभारणीच्या दृष्टिकोनातून संकल्पनात्मक योजना तयार करण्यासोबत बंदर क्षेत्र नौकानयन मार्ग व संबंधित सुविधा विकसित करणे, ब्रेक वॉटर बंधारा उभारणे तसेच सुरक्षितपणे व पर्यावरणीय दक्षता घेऊन बंदरामध्ये मालाची हाताळणी करण्याचे आराखडा तयार करणे अपेक्षित आहे.
सातपाटी या मासेमारी बंदरालगत नव्याने मुरबे येथील प्रस्तावित बंदर हे सातपाटी खाडीच्या लगत राहणार असल्यामुळे केळवा, माहीम, सातपाटी, मुरबा, नवापूर, उच्छेळी दांडी येथील मच्छीमारांना झळ पोचण्याची तसेच सातपाटी येथील नैसर्गिक बंदरावर या बंदराचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या बंदराच्या पालघर तालुक्यातील मुरबे यथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प उभारणी करण्यासाठी जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर यांची विकासक म्हणून नेमणूक करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मान्यता दिली. त्यामुळे वाढवणपाठोपाठ पालघर जिल्ह्यात दुसरा मोठा बंदर प्रकल्प उभा राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जेएसडब्ल्यू कंपनीने सन २०१५ मध्ये नांदगाव-आलेवाडी दरम्यान बंदर उभारणीचे प्रस्तावित केले होते. याला स्थानिक मच्छीमारांनी विरोध केला होता. बंदराविषयीचे प्रकरण उच्च न्यायालयात सुनावणीसाठी असताना जुलै २०२३ मध्ये कंपनीने आपण बंदर या ठिकाणी उभारणार नसण्याचे हमीपत्र दिले. राज्य शासनाने ऑगस्ट २०२३ मध्ये नवीन सागरी धोरणाच्या अनुषंगाने जेएसडब्ल्यूने ऑगस्ट महिन्यात नव्याने प्रस्ताव सादर केला. त्यात मुरबे समुद्र किनाऱ्यासमोरील उथळ खडकाळ क्षेत्रात भराव टाकून बंदर उभारण्याचे प्रस्तावित केले. त्यानुसार हे बंदर सातपाटी खाडीलगत उभारण्यास येणार आहे.
मुरबे बंदर कसे? : मुरबे समुद्रकिनाऱ्यापासून लंब पद्धतीने समुद्रामध्ये सुमारे पाच किलोमीटर अंतरावर दोन ब्रेक वॉटर बंधारे उभारून त्यामध्ये तीन धक्के उभारण्याचे प्रस्तावित आहे. मालवाहतूक करण्यासाठी ३२५ मीटर लांब व २४ मीटर रुंद जेटी, कंटेनर हाताळणीसाठी ४०० मीटर लांब व ४५ मीटर घाट (०४ं८) तसेच ३०० मीटर लांब व ४५ मीटर रुंद बहुउद्देशीय घाट उभारण्याचे प्रस्तावित आहे. या बंदराच्या उभारणीसाठी पाच वर्षांचा कालावधी लागणे अपेक्षित असून उभारणीनंतर पहिल्या वर्षी १८.६० दशलक्ष टन तर सहाव्या वर्षांनंतर २४.४३ दशलक्ष टन प्रतिवर्ष माल हाताळणी होणे अपेक्षित आहे.