गुन्हे

‘लोन ॲप’ वर झालेलं कर्ज फेडण्यासाठी भाच्याने प्रेयसीच्या मदतीने केली मामाच्याच घरात चोरी

वसई : ‘लोन ॲप’ वर झालेलं ८ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी मिरा रोड मध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या मदतीने मामाच्याच घरात चोरी केली. प्रेयसी आणि एका नातेवाईकाच्या मदतीने मामाच्या घरात शिरून नकली बंदुकीच्या सहाय्याने धाक दाखवून १० लाख रुपयांची रोकड लंपास केली.. काशिगाव पोलिसानी या प्रकरणी तपास करून या तरुणासह तिघांना अटक केली आहे. मिरा रोड पूर्वेच्या काशिगाव येथील जनता नगर मध्ये आदील अहमद (२९) पत्नी आणि दोन भावांसह राहतात. त्यांची अमूल दुधाची एजन्सी आहे. कंपनीकडून दूध विकत घेऊन वितरीत करण्याचे काम ते करतात. आदीत हे अपंग असल्याने ते वितरणासाठी जात नाहीत. सोमवारी सकाळी ४ च्या सुमारास आदील यांचे दोन्ही भाऊ दूध वितरणासाठी गेले होते. त्यावेळी आदील आणि त्यांची पत्नी घरात एकटी होते. अचानक दार उघडून तिन अनोळखी इसम घरात शिरले. त्यांनी बुरखा घातला होता. त्यामध्ये एक महिला होती. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून आदील आणि त्यांच्या पत्नीला बांधले. यावेळी घरात असलेली १० लाख रूपयांची रोकड घेऊन पळ काढला अवघ्या ५ मिनिटात हा लुटीचा थरार घडला होता.

या जबरी चोरीचा तपास करण्यासाठी काशिगाव पोलिसांनी पथके तयार केली. सीसीटीव्हीवरून आरोपीचा माग काढण्यात आला. पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपी घरातून निघाले आणि एका रिक्षात बसले. त्या रिक्षातून काही अंतरावर उभ्या असलेल्या एका वाहन बसून पसार झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या आधारे त्या वाहनाचा क्रमांक मिळवला आणि त्याचा मालकाचा शोध घेतला. ती कार बदलापूर येथील एका इसमाची होती. त्याने ती नया नगर येथील व्यक्तीला विकली होती. नया नगर येथील व्यक्तीने ती कार नालासोपारा येथील २३ वर्षीय झुबेर नावाच्या तरुणाला विकली होती. पोलीस त्या तरूणाकडे गेल्यावर धक्का बसला. कारण तो तरुण फिर्यादी याचाच भाचा निघाला. त्याने आपल्या प्रेयसी आणि आणि काकाच्या मदतीने ही लुटीची योजना बनवली होती, अशी माहिती काशिगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली.

झुबेर याने एका लोन ॲप वर कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम ८ लाखांवर गेली होती. त्यामुळे त्याला धमक्या मिळत होत्या. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने मामाला लुटण्याची योजना बनवली होती. मामाच्या घरात सकाळी रोख रक्कम जमा होते हे त्याला माहिती होते. त्यासाठी त्याने खेळण्यातील बंदुक घेतली. त्याच्यासोबत त्याची प्रेयसी इकरार (२१) आणि काका कामरान (३०) यांना सामिल केले. त्यांची योजना यशस्वी झाली खरी. परंतु मात्र काशिगाव पोलिसांनी तत्परतेने तपास करून अवघ्या ३६ तासात आरोपींना बेड्या ठोकल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button