पोलीसांची बदनामी केल्याप्रकरणी ‘या’ अभिनेत्यावर गुन्हा दाखल करा; ‘सुराज्य अभियान’ संस्थेची मागणी
मुंबई : महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश परिधान केलेला सिनेअभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी लोकांना जुगार खेळण्याचे आवाहन करत असल्याची धक्कादायक जाहिरात समोर आली आहे. ही जाहिरात ‘बिग कॅश पोकर’ (Big Cash Poker) या ऑनलाईन ॲपने केली आहे. जे पोलीस खाते जुगार खेळणार्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करते, त्याच पोलिसांच्या वेशात अशी जाहिरात केली जाते, हे महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलीन करणारे आणि धक्कादायक आहे. हिंदु जनजागृती समितीचे ‘सुराज्य अभियान’या संस्थेने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या जाहिरातीकडे दुर्लक्ष केले, तर अनेक अवैध, अनैतिक गाष्टींच्या जाहिरातींसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशाचा वापर केला जाऊ शकतो.
ऑन ड्युटी’ आणि गणवेशात असतांना पोलीस जुगार खेळण्याचे आवाहन करतांना दाखवणे, हे अवघ्या महाराष्ट्रासाठी लज्जास्पद असून ‘बिग कॅश पोकर’ ऑनलाइन ॲपवर महाराष्ट्र पोलिसांनी तत्परतेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘सुराज्य अभिमाना’ने केली आहे.या प्रकरणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ चे महाराष्ट्र राज्य समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडे १४ ऑक्टोबर २०२४ या दिवशी तक्रार केली आहे. यामध्ये ‘बिग कॅश पोकर’चे मालक अंकुर सिंघ, व्यवस्थापक आणि विज्ञापनात काम करणारे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यावर गुन्हा नोंदवावा, तसेच ‘महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त आणि अपील) नियम १९७९’ आणि ‘महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१’ द्वारे कठोर कारवाई करावी, अशी मागणी अभिषेक मुरुकटे यांनी केली आहे.
महाराष्ट्र पोलीस कठोर परिश्रम आणि प्रशिक्षण यांतून तयार होतात; मात्र या जाहिरातीतून ‘ऑनलाईन जुगारामुळे’ त्यांच्यात ‘स्कील’ येते, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस दलातील कोणालाही स्वतःहून या ॲपवर कारवाई करावीशी वाटली नाही ? या संदर्भात इतरांना तक्रार द्यावी लागत आहे, हे दुर्दैवी असल्याचेही मुरुकटे या वेळी म्हणाले. या प्रकरणी पोलीस खात्याचे प्रमुख म्हणून गृहमंत्र्यांनीही लक्ष घालावे, अशी मागणीही ‘सुराज्य अभियाना’ ने केली आहे.