पुणे पोलिसांकडून रहिवासी भागातील बेकायदा फटाका विक्रेत्यांवर गुन्हे दाखल
पुणे : रहिवासी भाग असलेल्या परिसरात बेकायदा फटाका विक्री दुकाने उघडण्यात आल्यानंतर या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. विमानतळ पोलिसांनी ४ फटका विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात चार फटाका विक्रेत्यांवर भारतीय नागरिक संहिता सुरक्षा २०२३ चे कलम ३५ (३) अन्वये पोलिसांनी नोटीस बजावून त्यांच्यावर गुन्हे नोंद केले आहेत. शहराच्या सर्वच भागात फटाका स्टॉल उभारलेले आहेत. या फटका विक्री दुकानांना अग्निशमन दल, महापालिका, तसेच पोलिसांकडून परवानगी दिली जाते. परवानगी देण्यापूर्वी अटी, शर्तींची पूर्तता देखील दिलेली असते. त्यानंतर त्यांना परवानगी दिले जाते. शहराच्या मध्यभागातील वर्तक बाग, गोळीबार मैदान परिसरात फटाके विक्री दुकाने आहेत. तेथील फटाका विक्रेत्यांना परवाना दिला जाते. दिवाळीची सांगता होईपर्यंत तेथे पुरेशा सुरक्षाविषयक उपाययाेजना केल्या जातात. तेथे अग्निशमन दलाचे जवान आणि बंबही ठेवले जातात. मात्र, काही भागात परवानगी न घेता फटाके स्टॉल उभारले जातात. अशांवर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.
दरम्यान, उपनगरातील काही ठिकाणी बेकायदा फटाका विक्री दुकाने उघडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार, विमानतळ पोलिसांनी कारवाई केली. नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅलजवळील गल्ली क्रमांक परिसरात सुरू असलेल्या फटाका विक्री दुकानदार, लोहगावमधील संतनगर परिसरातील गुरुराज फटका मार्टच्या मालकावर तसेच संतनगर परिसरातील महालक्ष्मी फटाका मार्ट, तर लोहगावमधील भाजी मंडई परिसरातील एकदंत फटका स्टाॅलच्या मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तेथील फटका विक्री दुकाने काढून टाकण्याचे आदेश दिले. फटाके जप्त करुन पोलीस ठाण्यात ठेवणे धोकादायक आहे. त्यामुळे पोलिसांनी फटाके जप्तीपेक्षा थेट दुकानमालकांना समज देऊन फटाक्यांसह दुकानच काढून टाकण्याचे आदेश दिले आहे. पोलीस ठाण्यात जप्त केलेले फटाके ठेवल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते.
रहिवासी भागात परवानगी शिवाय फटाक विक्री दुकाने सुरू करणाऱ्या दुकानमालकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. रहिवासी भागात फटाका विक्री दुकानात आग लागल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते. पोलीस, महापालिका प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या फटाका विक्रेत्यांवर कडक कारवाईची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. बेकायदा फटका विक्रीची दुकाने आढळून आल्यास नागरिकांनी त्वरीत पोलिसांकडे तक्रार करावी. – हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार