माझी वसुंधरा अभियानांतर्गत दिवाळीत फटाके फोडण्यावर महानगरपालिकेचे निर्बंध

वसई : प्रदूषण नियंत्रणासाठी दिवाळीत रात्री फक्त १० वाजेपर्यंतच फटाके वाजवा, असे आवाहन वसई -विरार महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवा आणि वायू प्रदूषण टाळण्यासाठी असे निर्देश देण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय फटाके कमी आवाज करणारे, कमी प्रदूषण करणारेच वाजवावेत, असे आवाहनही पालिकेने आयुक्त अनिलकुमार पवार यांनी केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआर क्षेत्रातील हवेची गुणवत्ता खाल्यावल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्याकामी विविध उपाय योजना आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्र शासनाने “माझी वसुंधरा अभियान ५.०० अभियानांतर्गत फटाकेमुक्त, कचरामुक्त ,प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक ग्रीन फेस्टिवल, सण उत्सव साजरे करण्याचा प्रयत्न करण्याबाबत सूचित केले आहे. त्यानुषंगाने सर्व नागरिकांना दिपावली कालावधीमध्ये रात्री ७ ते १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. तसेच सर्वांनी पर्यावरणपूरक, प्रदुषणमुक्त आणि कचरामुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत आवाहन करण्यात येत आले आहे.
फटाक्यांच्या प्रदूषित हवेमुळे लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, दम्यासारख्या आजाराचे रुग्ण अशा सर्वांनाच आरोग्याचा त्रास होतो. त्यासोबतच पर्यावरणाचेदेखील नुकसान होते. यातच वसई -विरार शहरात गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता ढासळल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. आता दिवाळीत मोठ्या प्रमाणात वाजवल्या जाणार्या फटाक्यांमुळे ही समस्या गंभीर होण्याचा धोका आहे. त्यामुळे पालिकेने वसई विरार करांना फटाके वाजवताना प्रदूषण टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
साधारण दिवाळी नोव्हेंबरच्या दरम्यान येते. या ऋतूबदलानंतर थंडी सुरू होत असते. थंडीत वातावरणात दमटपणा आणि झालेल्या बदलामुळे श्वसनाचे विकार वाढीस लागतात. दिवाळीदरम्यान होणारे प्रदूषण तसेच दमट हवा आदी कारणांमुळे नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत श्वसनविकाराच्या रुग्णसंख्येत वाढ होते. फटाक्यांमध्ये तांबे आणि कॅडमियमसारखे विषारी घटक असतात, जे हवेत धुलिकण स्वरूपात बराच काळ राहतात. त्यामुळे श्वसनाचे विकार बळावू शकतात. तसेच अस्थमाचा अॅटॅक, ब्रॉन्कायटिस, शिंका येणे, नाक गळणे, डोकेदुखी होऊ शकते. फटाक्यांमधून येणारा दूषित वायू हवेत मिसळल्यामुळे आणि ही हवा श्वसनावाटे शरीरात घेतल्यामुळे श्वसन आणि फुप्फुसांच्या विकारांत वाढ होते. जसजसे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण अधिक वाढते तशी आजारांची तीव्रता वाढते, असे तज्ञांचे मत आहे.