मध्य प्रदेशातून गोव्यात गांजाची तस्करी करणाऱ्यांना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुणे : मध्य प्रदेशातून गोव्यात गांजाची विक्रीस निघालेल्या गांजा तस्करांना खडकी पोलिसांनी अटक केली. दोघांकडून १ लाख ६० हजारांचा १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. जाबीर भिकन खाटीक (वय ३२, रा. वाघाडी, ता. शिरपूर, जि. धुळे), सोहेलअली जहीरअली शाह (वय २६, रा. चोपडा, जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सतीश जगदाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन चोरमले व त्यांच्या पथकाने केली आहे.
धुळे जिल्ह्यातून शिरपूर येथून दोघे जण एसटी बसमधून गांजा घेऊन गोव्यात विक्रीसाठी निघाल्याची माहिती खडकी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी ऋषीकेश दिघे यांना मिळाली होती. त्यानूसार या माहितीची खातरजमा केली. तेव्हा अमली पदार्थ तस्कर जाबीर आणि सोहेलअली मुंबई-पुणे रस्त्यावत येणार असल्याचे समजले. पथकाने सापळा चर्च चौकात सापळा लावला. पोलिसांच्या पथकाने दोघांना पकडले. त्यांच्याकडून १० किलो गांजा जप्त केला. दोघे जण एसटी बसमधून पुण्यात आले होते. पुण्यातून ते बसने गोव्यात गांजा विक्रीस जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांनी मध्य प्रदेशातून गांजा आाणल्याचे निष्पन्न झाले. शहरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ड्रग्ज मुक्त पुणेची मोहिम सुरू केली आहे. गेल्या वर्षभरापासून पुणे पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात कारवाई करुन गांजा, मेफेड्रोन असे अमली पदार्थ जप्त केले. कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीत छापा टाकून पोलिसांनी साडेतीन हजार कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते.
भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या ई-सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचा सुमारे साडेदहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिली कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कॉम्बिंग ऑपरेशन करीत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला संबंधित इसम परराज्यातील असून त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ई सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण १० लाख ४१ हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल सापडला. संबंधित इसम परराज्यातील असून त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.