गुन्हे

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा-२ पथकाकडून ९ पिस्तुलांसह शस्त्रसाठा जप्त

वसई : ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत घातपात घडविण्यासाठी रचण्यात आलेला कट मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा २ च्या पथकाने उधळून लावला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ९ देसी पिस्तुल, २१ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला असून ८ जणांना अटक केली आहे. सध्या राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून प्रचाराला सुरवात झाली आहे. या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच संभाव्य घातपाताच्या घटना रोखण्यासाठी पोलीस अधिक दक्ष असतात. मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा क्रमांक २ च्या पथकाला वसईच्या सुरूची बाग परिसकरात असलेल्या दोन तरूणांकडे पिस्तुल असल्याची माहिती मिळाली होती. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे एक पिस्तुल आणि जिवंत काडतुसे सापडली. यानंतर पुढील तपासात घातपात घडविण्याचा षडयंत्राचा पर्दाफाश झाला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे आणि त्यांच्या पथकाने गुजराथ आणि उत्तरप्रदेश येथे सापळा लावून तब्बल ८ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ९ देशी पिस्टल आणि २१ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

ही शस्त्रे उत्तरप्रदेशातून आणण्यात आली होती. मुंबई परिसरात ती विविध व्यक्तींना पोहोचविण्यात येणार होती. हे सर्व आरोपी गुन्हेगारी क्षेत्रातील असून वसई आणि मुंबई परिसरात शस्त्रे वितरित करण्याचे काम करतात. दिवसा ते गॅरेज मध्ये तसेच डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद बल्लाळ यांनी दिली. पोलीस उपायु्क्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा २ चे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजित गिते, रमेश भोसले, संजय नवले, रवींद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button