राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित; ‘लाडक्या बहिणींना १५०० नाहीतर २१०० रुपये देणार’
पुणे : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. इतकेच नाही तर राज्यातील ५० विधानसभा मतदारसंघासाठी ५० जाहीरनामे पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि स्थानिक नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात सर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध केले. ‘सरकार स्थापनेच्या १०० दिवसांत नवीन महाराष्ट्राचे व्हिजन आम्ही मांडू. माझी लाडकी बहीण योजनेतील रक्कम सध्याच्या १५०० वरून प्रति महिना २१०० पर्यंत वाढवण्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात ११ नवीन आश्वासने आहेत, ज्यात वृद्धापकाळ निवृत्ती वेतन १५०० वरून २१०० प्रति महिना वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी, पक्षाने केंद्र आणि राज्य सरकारच्या समर्थनासह शेतकरी सन्मान निधी प्रतिवर्ष १२००० वरून १५००० रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत आणि एमएसपीअंतर्गत विकल्या गेलेल्या सर्व पिकांसाठी २०% अतिरिक्त अनुदान देण्याबाबतही सांगितले आहे. याशिवाय धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देण्याचे आश्वासनही राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहे. आम्ही ग्रामीण भागात ४५००० हून अधिक रस्ते बांधण्याचा संकल्प केला आहे. हा उपक्रम महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा मासिक डीबीटी हस्तांतरण असेल जो २.३ कोटी महिलांना प्रतिवर्ष २५००० रुपयांचा लाभ देईल.
जाहीरनाम्यातील प्रमुख घोषणा :
- २५ लाख नोकऱ्या निर्माण करणार, सौर आणि अक्षय ऊर्जेला प्राधान्य देताना वीज बिल 30% कमी करण्याचे वचन, प्रशिक्षणाद्वारे १० लाख विद्याव्यांना १०००० मासिक स्टायपेंड
- अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना १५००० मासिक वेतन, १०० दिवसांत ‘नवीन महाराष्ट्र व्हिजन’ सादर करणार
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा प्रकाशित करण्याच्या निमित्ताने चाकण (ता.खेड) येथील आरती हॉटेल येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ऑनलाईन पद्धतीने बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.