पुष्पकनगर व द्रोणागिरी नोड परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाहनतळ व ढाबे सुरू
उरण : सिडकोकडून वसविण्यात येणाऱ्या पुष्पकनगर व द्रोणागिरी नोड परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाहनतळ व ढाबे सुरू आहेत. याकडे सिडकोचे सातत्याने दुर्लक्ष सुरू आहे. मात्र त्यामुळे येथील राष्ट्रीय महामार्गावरील सेवा मार्ग तसेच मुख्य मार्गावरही अवजड वाहने उभी करण्यात येत असल्याने वाहनचालक, नागरिक त्रस्त झाले आहेत. सरकारने प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांची बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. मात्र सिडकोकडून अनधिकृत टपऱ्या आणि भूमिपुत्रांच्या बांधकामांवर कारवाई केली जात आहे. या विरोधात भूमिपूत्र लढत आहेत. असे असताना सिडकोच्या भूखंडावर अनधिकृतपणे अवजड वाहनांचे वाहनतळ सुरू आहेत. यातील अनेक वाहनतळावरून भाड्याची वसुली केली जात आहे. द्रोणागिरी आणि पुष्पकनगर परिसरांत या वाहनतळांची संख्या मोठी आहे. याच अनधिकृत वाहनतळांशेजारी ढाबेही उभारण्यात आले आहेत. या ढाब्यातून विक्री करण्यात येणारे पदार्थ आणि वस्तू यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
राज्यात ड्रिंक अँड ड्राइव्हच्या घटनांत वाढ झाल्याने शासनाने पाऊल उचलले होते. मात्र ही कारवाई पुन्हा एकदा थंडावली आहे. याच वाहनतळांच्या परिसरात बंदी असलेला गुटखा विक्री केली जात आहे. त्यामुळे अमली पदार्थविरोधी कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. सिडकोच्या दुर्लक्षामुळे यात वाढ झाली आहे. या संदर्भात सिडकोच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क साधला असता याची माहिती घेऊन खात्री करावी लागेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.