पश्चिम रेल्वेची सात महिन्यांत विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली
मुंबई : विनातिकीट प्रवाशांकडून पश्चिम रेल्वे प्रशासनाने गेल्या सात महिन्यांत ८० कोटी रुपयांची दंडवसुली केली आहे. त्यातही दसरा, दिवाळीच्या काळात अनेक प्रवाशांनी गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिकीट तपासनीसांनी विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून एकट्या ऑक्टोबर महिन्यात १२ कोटी रुपयांची दंडवसुली केली. पश्चिम रेल्वेवरील सर्व तिकीटधारक प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा देण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. लोकल, रेल्वेगाड्या, पॅसेंजर ट्रेन, उत्सव विशेष रेल्वेगाड्यांमधून तिकीट नसलेल्या प्रवाशांना रोखण्यासाठी तिकीट तपासणी पथक सज्ज केले आहेत. तिकीट तपासनीसांच्या पथकांनी गेल्या सात महिन्यांत विनातिकीट प्रवाशांकडून ८०.५६ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये मुंबई उपनगरीय लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २६.६० कोटी रुपयांची दंडवसुली केली.
ऑक्टोबर २०२४ मध्ये आरक्षित न केलेल्या सामानासह २.०९ लाख विनातिकीट प्रवाशांचा शोध घेऊन, त्यांच्याकडून १२.१० कोटी रुपये वसूल केले. याशिवाय, ऑक्टोबरमध्ये पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये, फलाटावर ९३ हजार विनातिकीट प्रवाशांना शोधून ३.९० कोटी रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या सात महिन्यात धावत्या वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासणी करून, ३४,८०० विनातिकीट आणि सामान्य लोकलचे तिकीट असलेल्या प्रवाशांना पकडून सुमारे १.१५ कोटींचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, प्रवाशांनी कायम योग्य आणि वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.