रश्मी शुक्ला यांची पुन्हा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती; गृह मंत्रालयाकडून आदेश जारी
मुंबई : भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी (डीजीपी) पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. ४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाने त्यांची बदली केली होती. निवडणूक समितीने मुख्य सचिवांना संवर्गातील पुढील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे पदभार सोपवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, रश्मी शुक्ला यांच्या जागी संजय कुमार वर्मा यांच्याकडे डीजीपीचीचा पदभार सोपवण्यात आला होता. रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पदावरून तात्पुरती बदली करण्यात आली होती. रश्मी शुक्ला, १९८८ च्या बॅचच्या IPS अधिकारी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. रश्मी शुक्ला यांचे पुनरागमन निश्चित मानले गेले होते. यापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.
महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी त्या एक आहेत. त्यांनी सशस्त्र सीमा बल (SSB) चे केंद्रप्रमुख म्हणूनही काम केले. याशिवाय त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. राज्यात फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लाचे नाव चर्चेत होते. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती. त्याचीही चौकशी करण्यात आली.
मुख्यमंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, दोन वेळा मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात आहेत. दरम्यान, रश्मी शुक्ला यांच्या महाराष्ट्राच्या डीजीपी पदावर पुनर्नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. रश्मी शुक्ला याही देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या आणि एकनिष्ठ असल्याचं म्हटलं जातं.
रश्मी शुक्ला यांची पुन्हा नियुक्ती ही बेकायदेशीर, चुकीचा पायंडा पाडणारी व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अन्याय करणारी ठरेल. राज्य सरकारकडून रश्मी शुक्ला यांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पोलीस सेवेत घेऊ नये यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसच्या नाना पटोले यांनी राज्यपालांना पत्र पाठवून केली होती. मात्र, त्यानंतरही आता ही नियुक्ती झाल्याचे दिसत आहे.