प्रवासात आता सुटे पैसे ठेवण्याचे ‘टेन्शन’ नाही; QR Code च्या माध्यमातून करता येणार पेमेंट
मुंबई : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये आता प्रवाशांना तिकिटाची रक्कम ऑनलाईन करण्याची सुविधा मिळत आहे. यापूर्वी अन्य विभागामध्ये ही सुविधा होती. परंतु, मागील काही दिवसांत अकोला आगाराला नवीन तिकीट काढण्याच्या मशीन मिळाल्या आहेत. यात ३२० गाड्यांमध्ये क्यूआर कोडच्या मदतीने तिकीट काढता येणार आहे. त्यामुळे आता सुटे पैसे ठेवण्याचे प्रवाशांचे टेन्शन दूर झाले आहे. सध्याच्या युगात प्रत्येक नागरिकांकडे स्मार्टफोन आहे. सर्वत्र ग्राहक ऑनलाईन पैसे देताना दिसत आहेत. सर्व व्यवहारासाठी कॅशलेसवर भर दिला जात आहे. अशातच एसटीचे तिकीट रोख रक्कम देऊनच काढावे लागत होते. त्यामुळे वाहक आणि ग्राहकांमध्ये सुट्या पैशांवरून सातत्याने वाद होत होते. हे टाळण्यासाठी एसटीने पहिल्या टप्प्यात क्यूआर कोडच्या मदतीने तिकीट देण्याची सोय केली आहे.
पुढील टप्प्यात प्रवाशांना डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून तिकीट काढण्याची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही. या प्रयत्नांमुळे वाहकांचीही रोख रक्कम सांभाळण्यापासून सुटका झाली आहे. महामंडळात सर्व आगारात सेवा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एसटी तिकीट क्यूआर कोडद्वारे देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, अशा प्रकारची सेवा उपलब्ध केल्याची माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे. भविष्यात ऑनलाइन तिकीट काढताना रक्कम वजा झाल्यास अथवा तिकीट न मिळाल्यास प्रवाशांच्या मदतीसाठी महामंडळाकडून ४०० या क्रमांकावर हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. प्रवासी 8800688006 या क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवू शकतात. याशिवाय wecare<@>aritelbank.com येथे संपर्क साधूनही मदत मिळविता येणार आहे. हेल्पलाइनचे क्रमांक २४ तास उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.
या नव्या प्रणालीबाबत बसमध्ये फलक लावले पाहिजे, जेणेकरून प्रवाशांना याची माहिती मिळेल. त्यामुळेच बसमध्ये सूचना फलक लावण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.