महाराष्ट्र

स्थलांतरित पक्ष्यांची जिल्ह्यात यंदाही संख्या कमीच; वसईत १२८ प्रजातींची निरीक्षकांडून नोंद

वसई : वाढते प्रदूषण आणि पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या आसपास होणारे बांधकाम यामुळे प्रामुख्याने डोंबिवली येथील विविध ठिकाणी येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची यंदाही संख्या कमीच आढळून आली आहे. नुकत्याच झालेल्या पक्षी सप्ताहाच्या कालावधीत जिल्ह्यातील अनेक पक्षी निरीक्षक या ठिकाणी निरीक्षणासाठी आणि छायाचित्र काढण्यासाठी आवर्जून येत असतात. मात्र यंदा युरोप तसेच देशाच्या उत्तर भागातून स्थलांतर करून येणाऱ्या अनेक पक्ष्यांची येथे अद्याप नोंदच झालेली नाही. तर वसईत काही मोजक्या ठिकाणी स्थलांतरित पक्ष्यांची काही अंशी चांगली नोंद झाली असून काही पक्ष्यांचे पहिल्यांदाच वसईत मुक्काम केल्याची नोंद पक्षी निरीक्षकांडून करण्यात आली आहे.

थंडीची चाहूल लागल्यावर युरोपीय देशांतून स्थलांतर करून आलेले विविध पक्षी डोंबिवलीजवळच्या भोपर, कोपर, उंबार्ली टेकडी, सातपूल या परिसरात आढळतात. या सर्व स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी, छायाचित्रे काढण्यासाठी पक्षीनिरीक्षक आणिअभ्यासक गर्दी करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून पक्ष्यांच्या अधिवासाच्या परिसरातील वाढते बांधकाम आणि लोकवस्तीमुळे प्रदूषणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम पक्ष्यांच्या स्थलांतरावर झाल्याचे दिसून आले आहे. तलवार बदक, थापट्या, चक्रांग, काष्ठ तुतवार, मोठ्या ठिपक्यांचा गरुड, भुवई बदक, छोटा पाणलावा, लाल डोक्याचा रेडवी, करड्या मानेचा रेडवी, पांढुरक्या भोवत्या, कंठेरी चिखल्या यांसारखे पक्षी युरोपातून स्थलांतर करून डोंबिवली परिसरात येतात. मात्र यावर्षी ब्लू टेल बी इटर, थापटया, काही प्रमाणात तलवार बदक, मार्श हॅरियर इत्यादी मोजकेच पक्षी डोंबिवली जवळील भोपर, सातपुल, उंबारली या सारख्या शिल्लक असलेल्या पक्ष्यांच्या अधिवासात आढळून आले आहेत. तर बहुतांश पक्षी निरीक्षक पांढरा करकोचा, रणगोजा तसेच काळा बलाक यांसारख्या पक्ष्यांचे छायाचित्र काढण्यासाठी येत असतात. मात्र यंदाही या पक्ष्यांची अद्याप डोंबिवलीत हजेरी लावलेली नसल्याची माहिती डोंबिवलीतील युवा पक्षी निरीक्षक आणि अभ्यासक अर्णव पटवर्धन यांनी दिली आहे. तसेच अशाच पद्धतीने जर प्रदूषण आणि बांधकाम सुरु राहिले तर डोंबिवलीतील स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण अगदी नाहीच्या बरोबरीला येण्यास वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया अर्णव पटवर्धन यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button