मनपाची नालासोपाऱ्यात ४१ अनधिकृत इमारतींवर अखेर कारवाई सुरू
वसई : नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारतींवर गुरुवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात धोकादायक इमारती पाडल्या जाणार आहे. कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. कारवाई सुरू होताच नागरिकांचा प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. नालासोपारा पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथे ३० एकरचा मोठा भूखंड होता. त्यातील काही भूखंड खासगी तर काही भूखंड कचराभूमी आणि सांडपाणी प्रकल्पासाठी आरक्षित होते. २००६ मध्ये ही जमीन माजी नगरसेवक सीताराम गुप्ता व त्यांचे पुतणे अरुण गुप्ता यांनी बळकावली होती. २०१० ते २०१२ या कालावधीत या जमिनीवर बनावट बांधकाम परवानगी (सीसी) आणि भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) बनवून ४१ अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या. त्यात दोन हजारांहून अधिक कुटुंबे रहातात.
मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने या इमारती अनधिकृत ठरवून पालिकेला कारवाईचे निर्देश दिले होते. त्याच अनुषंगाने वसई विरार महापालिकेने पहिल्या टप्प्यात सात धोकादायक इमारती पाडण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजल्या पासून या इमारती मधील नागरिकांना बाजूला करून तोडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे या इमारती मध्ये राहणारी शेकडो कुटुंब बेघर झाली असून त्यांनी प्रशासनाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. तर काही रहिवाशांना कारवाई सुरू होताच अश्रू अनावर झाले आहेत. ४१ इमारती वरील ही कारवाई आतापर्यंतची पालिकेची सर्वात मोठी कारवाई आहे. यात शेकडो कुटुंब बेघर होणार आहेत. या कारवाईचे तीव्र पडसाद आधीपासूनच उमटू लागले आहेत. कारवाई दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, सीआरपीएफ अशी सर्व यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
आचोळे येथील जागा मलनिस्सारण आणि क्षेपण भूमीचे आरक्षण आहे. त्या ठिकाणी ४१ इमारती अनधिकृत पणे बांधल्या आहेत.राष्ट्रीय हरित लवादाने महापालिके विरोधात तक्रारी न्यायालयात केल्या होत्या. न्यायालयाने याबाबत इमारत पाडण्याचे आदेश दिल्याने आज पासून कारवाई सुरू केली आहे. : अनिलकुमार पवार, आयुक्त वसई- विरार महापालिका