पाणी देयक थकबाकीदारांविरोधात प्रशासनाची कारवाई; १७८० नळजोडण्या खंडीत
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयक थकबाकीदारांविरोधात प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत गेल्या दोन महिन्यांत थकाबाकीदारांच्या १७८० नळजोडण्या खंडीत केल्या आहेत. या कारवाईत १५२ मोटर पंप जप्त तर, ५० पंप खोल्यांना टाळे लावण्यात आले आहे. याशिवाय, ३ हजार ३५४ थकबाकीदारांना नोटीसा पाठवल्या असून त्याचबरोबर आतापर्यंत ५९ कोटी ४३ लाख रुपयांची पाणी देयके पालिकेने वसूल केली आहेत. तसेच पाणी देयकाचा भरणा करण्याऐवजी खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करुन घेतल्यास गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
ठाणे महापालिकेची पाणी देयक रक्कम सुमारे २२४ कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी ७६ कोटी रुपये ही थकबाकी आहे तर, चालू वर्षाची देयक रक्कम १४८ कोटी रुपये आहे. पाणी देयकांच्या वसुलीसाठी पालिका प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून पावले उचलली आहेत. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी देयकांच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी देयक वसुली अभियान सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पाणी देयकांच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडीत करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर खोल्यांना टाळे लावणे, अशी कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईला ११ स्पटेंबरपासून सुरुवात झाली असून आतापर्यंतच्या कारवाईत थकाबाकीदारांच्या १७८० नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत. या कारवाईत १५२ मोटर पंप जप्त तर, ५० पंप खोल्यांना टाळे लावण्यात आले आहे. याशिवाय, ३ हजार ३५४ थकबाकीदारांना नोटीसा पाठवल्या असून त्याचबरोबर आतापर्यंत ५९ कोटी ४३ लाख रुपयांची पाणी देयके पालिकेने वसूल केली आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ जोडण्यांच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट लागू करण्यास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्यता दिली आहे. ही योजना १ सप्टेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत लागू राहील. या योजनेचा लाभ घेऊन थकीत आणि चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरुन त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सवलत योजनेचा लाभ नागरिक घेवू शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी देयक धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील, अशांसाठी ही सवलत योजना लागू असणार नाही. तसेच ही योजना व्यवसायिक जोडणीधारकांना लागू असणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
प्रभाग समितीतील पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी देयक वसुलीची मोहीम राबवण्यात येत असून या कारवाईत हयगय करू नये, असे त्यांना निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी पाणी देयक वेळेत भरावे, तसेच थकबाकीदारांनी देयक भरून पालिकेस सहकार्य करावे. अन्यथा नळ जोडणी खंडित करण्यात येईल, असे उपनगर अभियंता (पाणी पुरवठा) विनोद पवार यांनी स्पष्ट केले आहे.