अणुऊर्जा केंद्राच्या ऑफसाइट ‘मॉक ड्रिल’ अभ्यासामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
![](https://thepravah.com/wp-content/uploads/2024/12/anu-urja-e1734069826263.jpg)
पालघर : तारापूर अणुऊर्जा केंद्राशी संबंधित आपत्कालीन कवायत अभ्यासासाठी सुरू असताना त्याअंतर्गत अधिकारी वर्गाला प्रसारित करण्यात आलेला संदेश नागरिकांपर्यंत समाज माध्यमावरून पोहोचल्याने एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानीय पुढारी, लोकप्रतिनिधी तसेच शाळा व महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्यापासून सर्वसामान्य नागरिकांकडून या संदेशाच्या पडताळणीसाठी प्रयत्नशील आहेत. या आपत्कालीन कवायतीची (मॉक ड्रिल) नागरिकांपर्यंत योग्य प्रकारे पूर्व सूचना देण्यात आली नसल्याने पालघर तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तारापूर अणुऊर्जा केंद्रातील अणभट्टीमध्ये किरणोत्सर्ग पसरवणाऱ्या रेडिओधर्मी पदार्थाची गळती झाली असून परिसरातील २७-२८ गावांमधील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याच्या मॉक ड्रिल दरम्यानचा अधिकारी वर्गापर्यंत मर्यादित राखण्याचे अपेक्षित असणारा अंतर्गत संदेश शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून नागरिकांपर्यंत समाज माध्यमां वरून प्रसारित झाला. या संदेशाच्या पहिल्या ओळीत “ऑफसाईट आपत्कालीन अभ्यासाकरिता” असे स्पष्टपणे नमूद असताना त्याच्याकडे लक्ष न देता हा संदेश समाजवाद माध्यमांवर वायरल झाल्याने परिसरात घबराहट पसरली.
परिणामी नागरिकांमध्ये तारापूर अणुऊर्जा केंद्रातून किरणोत्सर्ग पसरल्याची भावना निर्माण होऊन भीतीचे वातावरण पसरले. यामुळे शाळा, महाविद्यालयात असणाऱ्या आपल्या पाल्यांना घरी घेऊन येण्यासाठी पालकांकडून प्रयत्न सुरू झाले असून प्राचार्य व मुख्याध्यापक यांना पालकांच्या फोनचा भडीमार होऊ लागला आहे. याखेरीस स्थानीय राजकीय पुढारी, नेते व नागरिकांनी शासकीय पातळीवर तसेच पत्रकारांना घटनेच्या सत्यतेबाबत प्रश्नांचा भडीमार करून सत्यता पडताळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या विषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गोविंद बोडके यांच्याशी संपर्क साधला असता आज सकाळी तारापूर अणुऊर्जा केंद्रात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्या चे भासवून प्रथम ऑन साईट व नंतर ऑफसाईट इमर्जन्सी अर्थात अणुऊर्जा केंद्राच्या बाहेर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याचे भासवून बचाव कार्याची कवायत सुरू करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. या अभ्यासासाठी केलेला जाणाऱ्या कवायती मध्ये अशा आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्यासाठी अंदाजीत वेळे च्या तुलनेत प्रत्यक्षात किती वेळ लागतो, आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कामांचा निपटारा कशा पद्धतीने होतो व बचाव कार्याच्या आराखड्यात सुधारणा करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याचा अभ्यास केला जात असल्याचे सांगण्यात आले. पालघर तालुक्यात सुरू असलेली आपत्कालीन कवायत ही अभ्यासासाठी मर्यादित असल्याचे तसेच कोणत्याही प्रकारची गळती अणुऊर्जा प्रकल्पात झाली नसल्याचा खुलासा जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी लोकसत्ता कडे केला आहे. या शासकीय अधिकारी कर्मचारी व तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कर्मचाऱ्यांसाठी करण्यात येणाऱ्या अंतर्गत कवायती दरम्यान प्रसारित करण्यात येणारा संदेश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कसा पोहोचला याची स्वतंत्र चौकशी करून संबंधितांवरुद्ध कारवाई करण्याची असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.