
वृत्तसंस्था : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोक दलचे (INLD) प्रमुख ओम प्रकाश चौटाला यांचं २० डिसेंबर ला त्यांच्या गुरुग्राम येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.चौटाला पाच वेळा हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते माजी उपपंतप्रधान देवी लाल यांचे पुत्र होते. त्यांच्यावर दुपारी सिरसा जिल्ह्यातील तेजा खेरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. चौटाला यांच्या पश्चात दोन मुले अजय सिंह चौटाला आणि अभय सिंह चौटाला आणि तीन मुली असा परिवार आहे. अभय हे यापूर्वी हरियाणा विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. त्यांचा मुलगा अर्जुन चौटाला हे सध्या हरियाणातील रानिया मतदारसंघातून आमदार आहेत. अजय चौटाला यांचा मुलगा दुष्यंत चौटाला हे मनोहर लाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप-जेजेपी आघाडी सरकारच्या काळात हरियाणाचे उपमुख्यमंत्री होते.आयएनएलडीचे प्रवक्ते राकेश सिहाग यांनी सांगितलं की, ओम प्रकाश चौटाला यांची प्रकृती सकाळी बरी होती. मात्र, काही तासांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
चौटाला यांना २०१३ मध्ये भरती प्रकरणात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते आणि त्यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. या प्रकरणात दोषी ठरलेल्या ५५ जणांमध्ये त्यांचा मोठा मुलगा अजय चौटाला यांचाही समावेश आहे.या शिक्षेचा त्यांच्या राजकीय कारकीर्दीला मोठा फटका बसला आणि ते पुन्हा निवडणूक लढवू शकले नाहीत. चौटाला यांची जुलै २०२१ मध्ये तिहार तुरुंगातून सुटका झाली होती. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी संबंध तोडून देशात तिसरी आघाडी स्थापन करण्याचं काम हाती घेतले. त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी २०२१ मध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली.सप्टेंबर २०२२ मध्ये फतेहाबादमध्ये चौटाला यांच्या रॅलीत नितीश कुमार, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अकाली दलाचे सुखबीर सिंग बादल, राजद नेते आणि बिहारचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत सहभागी झाले होते.
ओमप्रकाश चौटाला त्यांच्या मालमत्तेवरूनही वादात सापडले होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत, त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. २००६ मध्ये सीबीआयने चौटाला कुटुंबाची एकूण संपत्ती १४६७ कोटी रुपये असल्याचं जाहीर केलं होतं. सध्या चौटाला कुटुंबातील अभय चौटाला, अजय चौटाला, रणजीत चौटाला, दुष्यंत चौटाला, नयना चौटाला, सुनैना चौटाला, आदित्य देवी लाल आणि अर्जुन चौटाला राजकारणात सक्रिय आहेत.