दिव्यांगाकरिता फिजिओथेरपी व बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचे खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

ठाणे : कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली दिव्यांग व्यक्तींसाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड यादेखील बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राच्या लोकापर्णाला उपस्थित होत्या. कल्याण डोंबिवली महाालिकेने दिव्यांग व्यक्तींसाठी फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्र सुरु केले आहे. या केंद्राचे लोकार्पण कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी भाजप आमदार सुलभा गायकवाड, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, महापालिका आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड आदी मान्यवर उपस्थित होते. महानगरपालिकेकडे सुमारे ५५०० दिव्यांग व्यक्तींनी आपली नोंद केलेली आहे. या दिव्यांग व्यक्तींसाठी आतापर्यंत महापालिकेमार्फत फिजीओथेरेपीची कोठलेही सुविधा उपलब्ध नव्हती. परंतु आता महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या दिव्यांग आणि मतिमंद व्यक्तींना ही सुविधा विनामुल्य उपलब्ध होणार आहे. केंद्रासाठी महापालिकेने काढलेल्या निविदेला मंजूरी दिली गेली. या कामाचे कार्यादेश आधार रिहॅबिलेटेड सर्विसेस यांना देण्यात आले आहेत. या केंद्रांमध्ये दिव्यांग नागरीक जे अंधत्व, बुटकेपणा, मतिमंद, स्नायु दौर्बल्य, सेरेब्रल पाल्सी, मानसिक आजार, स्वमग्नता, अध्ययन अक्षमता, थैलेसेमिया, सिकल सेल अनेमिया, वाचादोष, बहुविकलांगता, कर्णबधिरता हिमोफिलीया, लोकोमोटर डिसॅबिलीटी इत्यादी व्याधींनी पिडीत आहेत, अशा दिव्यांग व्यक्तींना या केंद्राच्या माध्यमातुन आरोग्य सुविधा निःशुल्क पुरविण्यात येणार आहेत.
याप्रसंगी खासदार शिंदे यांनी सांगितले की, अशा प्रकारचे केंद्र सुरु करणारी कल्याण डोंबिवली महापालिका ही पहिली महापालिका असेल. उल्हासनगरात सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सुरु करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर कल्याणमध्ये सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. याशिवाय डोंबिवलीतील जुन्या सुविधा गृहाच्या जागेत कर्करोग रुग्णालय बांधले जात आहे. त्याचबरोबर त्याठिकाणी ५० बेड क्षमता असलेले सुविधा गृह बांधले जाणार आहे. या आरोग्याच्या अद्यावत सोयी सुविधा लवकर कल्याण डोंबिवलीतील नागरीकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरीकांना उपचारासाठी ठाणे, मुंबईला धाव घ्यावी लागणार नाही.कल्याण आणि आसपासच्या परिसरातील दिव्यांग व्यक्तींना योग्य ती आरोग्य सेवा पुरविण्यात यावी या हेतूने या फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण करण्यात आले आहे. आरोग्य केंद्राचा तुटवडा असल्याने शहर आणि परिसरातील रुग्णांना मुंबईला जाऊन उपाचार घ्यावे लागतात.