प्रवाशांच्या सेवेसाठी मुंबई मेट्रोची सुविधा; १.३ लाख चौरस फुट व्यावसायिक जागा वितरित

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRC) ने मेट्रो लाईन-३ च्या २७ स्थानकांवर सुमारे १.३ लाख चौरस फुट व्यावसायिक जागा यशस्वीरित्या वितरित केल्या आहेत. या जागा विविध व्यावसायिक उद्देशांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत, ज्या खाद्य व पेय (फूड अँड बेव्हरेज), रिटेल, बँक एटीएम आणि व्हेंडिंग मशीन यांसारख्या क्षेत्रांमध्ये वापरल्या जातील. वितरित जागांमध्ये मोठ्या फ्लोअर प्लेट्सपासून ते लहान छोट्या दुकानांपर्यंत विविध प्रकारची जागा उपलब्ध आहे. सुमारे ४०,००० चौरस फुटांच्या मोठ्या फ्लोअर प्लेट्सपासून १०० चौरस फुटाच्या लहान दुकानांचा समावेश आहे, जे विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतात.
या व्यावसायिक जागा MMRC च्या खुल्या निविदा प्रक्रियेने वितरित केल्या जात आहेत, ज्यामुळे अधिक प्रमाणात व्यावसायिक संधी निर्माण होण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे मेट्रो प्रवाश्यांना विविध सेवा आणि सुविधा मिळविण्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहेत. MMRC ने हे सुनिश्चित केले आहे की या जागा उच्च मानकांच्या आणि ग्राहकांच्या गरजांनुसार डिझाइन केलेल्या असतील. या निविदांमध्ये टाटा ट्रेंट, इंडिया रिटेल अँड हॉस्पिटॅलिटी, नमन ग्रुप, अमर टी, वारणा सहकारी, रोजिअस रिटेल, मिस्टिकल ग्रुप, डेलिसिया फूड्स, आणि चितळे बंधू यांसारख्या प्रमुख उद्योगसमूहांनी भाग घेतला होता. या व्यावसायिक जागा मेट्रो-३ स्थानकांच्या महत्त्वाच्या जागी असल्याने व भविष्यात या मार्गावरील वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेता या निविदेला अनेक नामांकित उद्योग समूहाचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या द्वारे प्राप्त होणाऱ्या महसुलामुळे जायकाचे कर्ज फेड करण्यास व मेट्रो-३ कार्यान्वयनाचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.
नॉन फेअर रेव्हेन्यू संदर्भातील कामांचे व्यवस्थापन ऑक्टस अॅडव्हायजर्स या सल्लागार कंपनीकडून केले जात आहे. याविषयी एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक, अश्विनी भिडे म्हणाल्या की “भाडे उत्पन्नाच्या व्यतिरिक्त इतर स्रोतांमधून मिळणारी कमाई मेट्रोचे तिकिट दर वाजवी ठेवण्यासाठी उपयोगी ठरेल, ज्यामुळे मेट्रो प्रवाशांसाठी अधिक सुलभ आणि फायदेशीर होईल व मुंबईत सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यावरणपूरक पर्यायाचा वापर वाढेल. पर्यावरणपूरक वाहतुकीचा स्वीकार करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्यास मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि राहणीमानचा दर्जाही उंचावेल.”