२५ लाखांच्या दागिने चोरीचा छडा लावण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश

वसई : नालासोपारा पश्चिमेच्या नाळे गावात झालेल्या २५ लाखांच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा तब्बल ६ महिन्यांनी लावण्यात नालासोपारा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. या प्रकरणातील ३ आरोपींना भिवंडी, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथून अटक केली आहे. या चोरीचा छडा लावणे पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले होते. नाळे गावातील दिव्येश म्हात्रे यांच्या घरात ८ जुलै २००४ रोजी चोरी झाली होती. अज्ञात चोरांनी घरातील ६२० ग्रॅम वजनाचे सुमारे २५ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले होते. गावात झालेल्या या चोरीने बरीच खळबळ उडाली होती. नालासोपारा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या प्रकरणी तपास सुरू केला होता. आरोपी रिक्षातून जात असल्याचे सीसीटीव्हीतून दिसून आले होते. पोलिसांनी सुमारे ८० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून माग काढला. ही रिक्षा भिवंडी येथे आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी योगेश गोविंद (३१) याला अटक केली. त्याने रिझवान अन्सारी (३०) आणि मोझम शेख (२९) या दोघांसोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली. मात्र दागिने घेऊन रिझवान आणि मोझम उत्तर प्रदेशात गेल्याचे त्याने सांगितले. त्यांनतर पोलिसांनी मोझम शेख याला उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातून अटक केली. मात्र तिसरा आरोपी रिझवान अन्सारी सर्व दागिने घेऊन फरार झाला होता. दोन आरोपी अटक होऊनही पोलिसांना मुद्देमाल मिळाला नव्हता आणि हे प्रकरण प्रलंबित होतं.
रिझवान कुणाच्याही संपर्कात नव्हता. त्यामुळे त्याला पकडणे मोठे आव्हान बनले होते. पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र त्याने आपली ओळखच लपवली होती. केस, दाढी वाढवून तो गाळ्याला मफलर लावून रिक्षा चालवत होता. तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या यंत्रणेला कामाला लावले होते. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी रिक्षाचालक बनून सापळा लावला होता. अखेर ६ महिन्यांनी त्याला अटक करण्यात यश आले. त्याच्याकडून चोरी केलेले १५० ग्रॅम वजनाचे ११ लाख २५ हजार रुपये किंमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले. उर्वरित दागिने त्याने विकले होते. याप्रकरणात दागिने विकत घेणारा सराफ आणि दोन आरोपींच्या बायका देखील सहभागी असून त्यांचा देखील पोलीस शोध घेत आहेत. तळोजा कारागृहात बनवली योजना सर्व आरोपी सराईत चोर आहेत. हे तिन्ही आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यात तळोजा येथील तुरुंगात एकत्र होते. त्यावेळी त्यांनी एकत्र येऊन ही चोरीची योजना बनवली होती. त्यांनी एकत्र येऊन केलेल्या चोरीच्या अन्य तीन गुन्ह्यांची देखील उकल करण्यात यश आले आहे. पोलीस उपायुक्त ( परिमंडळ ३) जयंत बजबळे, नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र चंदनकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश मोरे, प्रशांत साळुंखे, अमोल तटकरे, कल्याण बाचकर, राजेश नाटुलकर, प्रेम घोडेराव, प्रताप शिंदे, बाबा बनसोडे, सोहेल शेख आदींच्या पथकाने या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना अटक केली.