महाराष्ट्र

पोलीस आयुक्तालयाची इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा; शासनाकडून २८ कोटींचा निधी मंजूर

मिरारोड : मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी मिरा रोड येथे आरक्षित करण्यात आलेली जागा भूसंपादित करण्यासाठी शासनाने २८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाची इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना १ ऑक्टोबर २०२० रोजी झाली असून, यास आता जवळपास पाच वर्षे पूर्ण होत आहेत. पालघर आणि ठाणे ग्रामीण पोलिसांचे विभाजन करत या स्वतंत्र आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली.स्थापनेपासूनच पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयीन कामकाजासाठी इमारत उपलब्ध नसल्यामुळे, मिरा-भाईंदर महापालिकेची रामनगर येथील तात्पुरती इमारत भाड्याने घेऊन तेथे कामकाज सुरू करण्यात आले.

त्यानंतर, स्वमालकीची पोलीस आयुक्तालयाची इमारत आवश्यक असल्याने, ती मिरा रोडच्या मिरागाव येथील पोलिस मुख्यालयासाठी आरक्षित ११,८१५ चौरस मीटर जागेत उभारण्याचे निश्चित करण्यात आले. या जागेतील ७,००० चौरस मीटर जागा मिरा-भाईंदर महापालिकेच्या ताब्यात असल्यामुळे, ती २०२१ साली २० कोटी रुपये अदा करून बाजारभावानुसार खरेदी करण्यात आली.उर्वरित ४,५९४ चौरस मीटर जागा खाजगी मालकीची असून, ती भूसंपादित करण्यासाठी जागेचे मूल्यांकन करून त्याचा अहवाल गृह खात्याकडे सादर करण्यात आला होता. मात्र निधी उपलब्ध नसल्यामुळे ही प्रक्रिया रखडली होती. परिणामी पोलीस आयुक्तालय उभारणीचे काम प्रशासनाला हाती घेता येत नव्हते.त्याकरिता निधी मंजुरीसाठी पोलीस आयुक्तालयाकडून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्यानुसार नुकताच राज्य सरकारकडून २७ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ३० जुलै रोजी गृह विभागाकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तालय उभारणीच्या अनुषंगाने आराखडा तयार करण्यासाठी राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडून आर्किटेक्ट नेमण्यात आला आहे.खाजगी जागेचे भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण जागा ताब्यात आल्याची बाब पोलीस आयुक्तालयाकडून महामंडळाला कळवण्यात येईल. त्यानंतर इमारतीचा आराखडा व त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा अहवाल महामंडळ राज्य सरकारकडे सादर करणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button