आमदार कालिदास कोळंबकर यांनी घेतली हंगामी अध्यक्ष पदाची शपथ

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार कालिदास कोळंबकर यांची दुसऱ्यांदा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राजभवन येथे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. त्यामुळे, विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन काळात त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेचं कामकाज होणार आहे. विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन आज शनिवार दि. ७ डिसेंबर २०२४ पासून बोलवण्यात आले आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून कर्मचाऱ्यांना याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. कालिदास कोळंबकर यांनी राजभवनात विधानमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून आज (शुक्रवार, ६ डिसेंबर २०२४) शपथ घेतली. याआधी २०१४ सालीदेखील त्यांनी हंगामी अध्यक्षपद भुषविले होते. राज्यापालासंहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते.
कालिदास कोळंबकर हे महाराष्ट्र विधानसभेचे आठ वेळा सदस्य झाले आहेत. ते शिवसेनेतर्फे पहिल्यांदा १९९० साली नायगाव मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर १९९५, १९९९ आणि २००४ मध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत शिवसेनेचे उमेदवार म्हणून एकूण सलग चार वेळा नायगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र २००५ साली त्यांनी नारायण राणे यांना साथ देत शिवसेना पक्ष सोडला आणि कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून वडाळा मतदारसंघातून विजय मिळवला. २०१९ च्या निवडणुकी अगोदर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ आणि २०२४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार म्हणून वडाळा मतदारसंघात विजय मिळवला. सलग ८ वेळा विजय मिळवणाऱ्या आमदारांपैकी कोळंबकर एक आहेत.
भारतीय राज्यघटनेच्या कलम १८० मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की राज्याचे राज्यपाल विधानसभेचे संचालन करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करू शकतात, जो तात्पुरता अध्यक्ष म्हणजेच हंगामी अध्यक्ष म्हणून काम करेल. या हंगामी अध्यक्षाचा कार्यकाळ हा स्थायी विधानसभा अध्यक्षांची निवड होईपर्यंतच असतो. हंगामी अध्यक्ष म्हणून अनेकदा सभागृहातील ज्येष्ठ आमदारांची निवड केली जाते. हंगामी अध्यक्षाच्या कर्तव्यांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणे, विधानसभा अध्यक्षांची निवड करणे, सभागृहामध्ये बहुमत चाचणी घेणे आणि स्थायी विधानसभा अध्यक्षांची निवड होईपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे यांचा समावेश होतो. कोळंबकर यांना २०१४ मध्येही हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले होते. महाराष्ट्राच्या १५ व्या विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन शनिवार ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही ९ डिसेंबरला होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांची पुन्हा नियुक्ती केली जाईल अशी चर्चा आहे.