भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड यांचे आज वयाच्या ८४ व्या वर्षी निधन

मुंबई : ज्येष्ठ राजकारणी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड यांचे आज ब्रेनस्ट्रोकने वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणाले की, मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्व केले. मंत्री, विरोधी पक्षनेते, अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. समाजात वावरताना अगणित लोकांचे आयुष्य त्यांच्यामुळे उजळले. जीव ओतून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले. आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा उभारल्या. आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. अकोले तालुक्यात जलसिंचनासाठी त्यांनी केलेले काम मोठे होते. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी छाप उमटवली. त्यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे. मुख्यमंत्र्यांसहित अनेक राजकीय क्षेत्रातील आणि इतर क्षेत्रातील लोकांनीही मधुकरराव पिचड यांना श्रध्दांजली अर्पित केली आहे.
मधुकरराव पिचड यांनी पंचायत समिती ते जिल्हा परिषदेपासून राजकारणाची सुरुवात केली. ते अहिल्यानगरमधील अकोले मतदारसंघातून १९८० साली पहिल्यांदा विधानसभेवर आमदार झाले होते. त्यानंतर २०१४ पर्यंत तब्बल ३५ वर्षे त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९९१ साली ते आदिवासी विकास खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर त्यांच्याकडे इतर खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती. १९९५ ते १९९९ याकाळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. शरद पवार यांचे विश्वासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली त्यावेळी मधुकरराव पिचड यांनी महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या बांधणीकरिता अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. केवळ आदिवासी समाजाचे नेते म्हणूनच नाही तर पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी पक्षामध्ये आपले स्थान निर्माण केले. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले. १९९९ ते २००३ या दरम्यान ते आदिवासी विकास मंत्री होते तसेच २०१३ ते २०१४ या कालावधीतही त्यांनी या खात्याचे मंत्री म्हणून कार्य केले. २०१९ मध्ये त्यांनी आणि त्यांचे पूत्र वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. हा प्रवेश शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला गेला. २०२१ पासून त्यांचे पुत्र वैभव पिचड हे भाजपमध्ये आदिवासी मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री म्हणून कार्यरत आहेत.