महाराष्ट्र

वसईत ‘भू प्रणाम केंद्र’ सुरू; जमीन व्यवहारातील आर्थिक लुटीला चाप, नागरिकांना दिलासा

विरार : सध्या वसई, विरार जमीन व्यवहारासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या कागदपत्रांच्या कामांसाठी नागरिकांची लूट होत होती. या लुटीला आता चाप बसणार आहे. भूमीअभिलेख विभागात मोजणी व विविध प्रकारची कामे जलदगतीने मार्गी लागावी यासाठी वसईत ‘भूप्रणाम केंद्र’ सुरू केले आहे. नागरिकांची कामे ऑनलाइन स्वरूपात मार्गी लागणार आहेत. वसईच्या भूमीअभिलेख कार्यालयात केंद्राचा उद्घाटन सोहळा पार पडला. पालघर जिल्ह्यातील हे दुसरे भू प्रणाम केंद्र आहे. सध्या वसई, विरारमध्ये जमिनीचे व्यवहार अधिकच वाढले आहेत. त्यामुळे जागा निश्चित करणे, मोजणीची कामे ,जागेचा आराखडा तयार करणे अशी विविध प्रकारची कामे नागरिकांना बाहेरून ऑनलाइन स्वरूपात करवून घ्यावी लागत होती. यासाठी अधिकचे पैसे खर्च करावे लागत होते. तर काहींना याची माहिती नसल्याने नाईलाजाने अशी कामे दलालाकडून करवून घ्यावी लागत होती. अशा वेळी आर्थिक लुटीचे प्रकार घडत होते. आता सुविधा ऑनलाइन उपलब्ध झाल्याने नागरिकांच्या होणाऱ्या आर्थिक लुटीला चाप बसेल, असा विश्वास भू अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

भूमी अभिलेख विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध कागदपत्रांसाठी नागरिकांना कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. अनेकदा कार्यालयांमध्ये नागरिकांच्या कामाला विलंब होत असल्याने कटू अनुभव देखील येत असतात. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी व उत्तम सेवा मिळावी यासाठी वसईच्या भूमीअभिलेख कार्यालयातच या केंद्रांची निर्मिती केली आहे. यासाठी जमाबंदी आयुक्त यांच्यातर्फे दहा लाख रुपयांचा निधीही उपलब्ध झाला आहे. या केंद्राच्या निर्मितीमुळे नागरिकांना ऑनलाइन स्वरूपात मोजणीचे अर्ज दाखल करता येणार आहेत. यापूर्वी जो ऑनलाइन मोजणी प्रक्रियेसाठी दोन ते सहा महिने कालावधी लागत होता तो आता अवघ्या महिनाभरातच हे काम ऑनलाइन पूर्ण केले जाणार, असे भूमिअभिलेख उपअधीक्षक अमोल बदडे यांनी यावेळी सांगितलेे.तसेच संगणकीकृत मिळकत पत्रिका, सातबारा उतारा, रंगीत नकाशे, फेरफार नोंदीचा उतारा परिशिष्ट अ, ब ची प्रत, नमुना ९ व १२ ची नोटीस, रिजेक्शन पत्र, निकाल पत्र, अर्जाची पोच, त्रुटी पत्र, नोंदवहीचा उतारा, अपिल निर्णयाच्या प्रती व संगणकीकृत तयार होणारे अभिलेख उपलब्ध करून दिले जाणार आहेत अशी माहिती भूमिअभिलेख विभागाकडून देण्यात आली. यावेळी वसईच्या आमदार स्नेहा दुबे- पंडित, नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक, जिल्हा भूमिअभिलेख अधीक्षक नरेंद्र पाटील, वसई भूमिअभिलेख उपअधीक्षक अमोल बदडे आदी उपस्थित होते.

भूप्रणाम केंद्र हे अतिशय चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र याची सर्वसामान्य नागरिकांना झाली पाहिजे व याचा अधिक नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे. यासाठी मुख्यत्वे करून तलाठी कार्यालय, तहसीलदार, प्रांतकार्यालय अशा सर्वच ठिकाणी केंद्राच्या संदर्भात माहिती फलक लावून जनजागृती करण्यात यावी अशा सूचना आमदार स्नेहा दुबे-पंडित व राजन नाईक यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

भूप्रणाम केंद्र हे शेतकरी व खातेदार यांच्यासाठी खूपच लाभदायक ठरणार आहे. त्यांना चलन, मोजणीअर्ज, भूमापन नक्कल हे सर्व ऑनलाइन मिळणार आहे. त्यामुळे त्यांना या कार्यालयात जास्त चकरा मारण्याची गरज भासणार नाही. त्यांचा वेळ वाचेल.-नरेंद्र पाटील, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख पालघर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button