गुन्हे

नवी मुंबईतील २० पोलीस ठाण्यांमध्ये महिन्याभरात ११८ बांगलादेशी नागरिकांना अटक

नवी मुंबई : नवी मुंबईतील विविध २० पोलीस ठाण्यांमध्ये मागील महिन्याभरात ११८ बांगलादेशी नागरिकांना पोलीसांनी अटक केली आहे. यामध्ये ५६ महिला आणि ५७ पुरुष आणि पाच बालके आहेत. संशयित बांगलादेशी नागरिकांनी सादर केलेल्या पुराव्यांची पडताळणी पोलीस अद्यापही संबंधित विभागाकडून करत आहेत. बांगलादेशी नागरिकांच्या अवैध वास्तव्यामुळे राज्य आणि देशावर होणारा परिणाम तसेच वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिक त्रासले असून बांगलादेशींना पकडून त्यांना त्यांच्या देशात रवानगी करावी अशी मागणी विधिमंडळात भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. हे बांगलादेशी नागरिक विविध आठवडे बाजारांमध्ये व्यवसाय करत असून अशा अवैध आठवडी बाजारांवर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्यांना २१ डिसेंबरपासून बांगलादेशी नागरिकांना अटक करण्याचे आदेश दिले.

सर्वच पोलीस ठाण्यांच्या परिसरात आधारकार्ड, मतदान ओळखपत्र आणि महापालिकांचे जन्मदाखल्यांचे पुराव्यांची तपासणी करुन सूमारे ८०० हून अधिक संशयित बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी प्राथमिक चौकशीत ११८ बांगलादेशी नागरिक नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये राहत असल्याचे उघड झाले. आतापर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील बांगलादेशी नागरिकांना एका महिन्यात पकडण्यात आलेली सर्वात मोठी संख्या आहे. या कारवाईमध्ये नवी मुंबई पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचा आणि सर्वच पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. सर्व पोलिसांनी एकजुटीने तपास केल्यामुळे आतापर्यंत ११८ बांगलादेशी सापडले आहेत. अजूनही शेकडो जणांनी सादर केलेल्या पुराव्यांची छाननी पोलीस करत असल्याची माहिती नवी मुंबईच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी दिली.

पोलिसांनी अटक केलेल्या बांगलादेशातील नागरिकांपैकी अनेकांनी नवी मुंबईतील महापालिकांच्या जन्मदाखल्यांचे पुरावे पोलिसांना दिले आहेत. फेरीवाला, मजूर काम, घरातील धुणीभांडी, लेडीज सर्व्हिस बार अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही मंडळी काम करत असल्याचे पोलिसांना आढळले आहे. नवी मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी बांगलादेशी नागरिकांना घर भाड्याने दिल्यास किंवा कामावर ठेवल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा नोंदविण्यात येईल असे बजावले आहे. अवैध वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची धरपकड अशीच सुरू राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button