एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही धुडकावल्या भाजपच्या ऑफर्स
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधित १३२ जागा मिळाल्याने यावेळी भाजपने मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. केंद्रातही देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जवळपास निश्चित झाले आहे.पण दुसरीकडे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. पण भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाऐवजी दोन ऑफर देण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रिपद किंवा केंद्रात मंत्रीपद असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याने नाराज असल्याचेही बोलले जात आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात होते. पण विधानसभा निवडणुकीतील देवेंद्र फडणवीसांची मेहनत आणि त्यांचे कष्ट पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद दिले जावे,यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वावर दबाव टाकला जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही बिहार पॅटर्न राबवावा आणि एकनाथ शिंदे यांना मुखअयमंत्रीपद द्यावे अशी मागणी होत आहे. भाजप बिहार पॅटर्न राबवण्याच्या मनस्थितीत नाही. इतकेच नव्हे तर भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता,असेही भाजपकडून सांगितले जात आहे.
एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी फायनल होत आहे. त्यामुळे भाजपच्या केंद्रातील पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ शिंदे यांना दोन पर्याय देण्यात आले आहेत. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद घ्या किंवा केंद्र सरकारमध्ये सामील व्हा आणि तुमच्या मुलाला म्हणजेच श्रीकांत शिंदे यांना राज्य सरकारमध्ये पाठवा, असे दोन प्रस्ताव भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवले आहेत. पण एकनाथ शिंदे यांनी भाजपचे हे प्रस्ताव धुडकावलयाची माहितीही समोर आली आहे. एकनाथ शिंदे यआणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली पण कोणताही निर्णय़ झाला नाही. त्यामुळे या विषयात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच हस्तक्षेप करतील, असे वृत्त आहे. इतकेच नव्हे तर भाजपच्या दोनही ऑफर्स धुडकावल्यानंतर ही एकनाथ शिंदे कोणाशीही भेटीगाठी घेण्याचेही टाळत असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांना १७८ आमदारांनी पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचे पारडे जड झाले आहे. तर शिंदे समर्थकांकडून एकनाथ शिंदे यांच्या नावाची आग्रही मागणी केली जात आहे. शिवसेना नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदासाठी फिल्डिंग लावली जात आहे.