महाराष्ट्रमुंबई

मध्य रेल्वेने १२ रेल्वे कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्काराने केले सन्मानित

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना यांनी मुंबई विभागातील तीन, भुसावळ विभागातील चार, पुणे आणि सोलापूर विभागातील प्रत्येकी दोन आणि नागपूर विभागातील एक कर्मचाऱ्याला सुरक्षा पुरस्काराने सन्मानित केले.मागील महिन्यात कर्तव्य निभावताना रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखवलेली सतर्कतेमुळे रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू राहिली. कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने संभाव्य अपघात आणि रेल्वेचे नुकसान टळले. या योगदानाबद्दल त्यांना सुरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय संरक्षा कार्याचे प्रशस्तीपत्रक आणि रोख दोन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मुंबई विभागातील पनवेल येथील ट्रेन व्यवस्थापक धर्मराज सिंग मालगाडीची तपासणी करीत होते. यावेळी एक वॅगन एक्सल अ‍ॅडॉप्टर एक्सल ट्रॉलीपासून वेगळा झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ही बाब तातडीने संबंधितांना कळवली आणि संभाव्य दुर्घटना टळली. सीएसएमटी येथील ट्रेन व्यवस्थापक रामदास चौधरी यांना ठाण्यातील मोटरमन आणि ट्रेन व्यवस्थापक दालनात काही तरी जळत असल्याचा वास आला. मोटरमनच्या बॅगला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ संबंधितांना सूचना देऊन अग्निशमन यंत्रांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि सावधगिरीमुळे संभाव्य अपघात टळला.

तसेच जीवित आणि वित्त हानी टाळता आली. इगतपुरी येथील फिटर सचिन जगदाळे  मालगाडीची तपासणी करीत होते. त्यावेळी वॅगनच्या एक्सल बाॅक्समधील बेअरिंग कप तुटल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी संबंधिताना वेळीच माहिती दिल्याने संभाव्य अपघात टळला. तसेच भुसावळ, पुणे, सोलापूर आणि नागपूर विभागांतील कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे रेल्वेचे नुकसान टाळता आले. पुरस्कार वितरण समारंभास मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक जगमोहन गर्ग, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी चंद्र किशोर प्रसाद यांच्यासह विभागप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button