भाजप व मनसेची छुपी युती; भाजपकडून मनसेच्या दोन उमेदवारांना पाठिंबा
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून बैठका देखील वाढल्या आहेत. प्रचारासाठी शेवटचे दोन आठवडे राहिले असल्यामुळे सभा व दौरे केले जात आहेत. उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून काही बंडखोरी करणाऱ्या नेत्यांनी अर्ज मागे देखील घेतले आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. यामध्ये आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. भाजपकडून मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला जात असल्यामुळे चर्चा वाढल्या आहेत. राज्यामध्ये महायुतीसह महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरे जात आहे. तसेच तिसरी आघाडी देखील तयार झाली आहे. यामध्ये आणखी एका युतीची चर्चा आहे ती म्हणजे भाजप व मनसे या पक्षांची युती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. मनसेकडून अनेक उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची उमेदवार चर्चेंची ठरली आहे. माहिम विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांना भाजपकडून पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे. महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर असताना देखील भाजपने अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अमित ठाकरे आमच्या घरातीलच मुलगा असून आम्ही त्याच्यासाठी प्रचार करू अशी भूमिका घेतली. यामुळे मतभेद देखील झाले. यानंतर आता आणखी एका जागेवर भाजपने मनसेला पाठिंबा दिला आहे.
मनसेकडून शिवडी मतदारसंघामध्ये देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवडी मतदारसंघामध्ये बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार व विद्यमान आमदार अजय चौधरी यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे चुरशीची लढाई होणार आहे. या मतदारसंघात महायुतीने उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे महायुती बाळा नांदगावकरांच्या पाठीमागे भाजप पाठिंबा देणार आहे, त्यामुळे आता भाजपकडून मनसेच्या दोन उमेदवारांना पाठिंबा दिला जाणार आहे. निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंनी यांनी निवडणुकीनंतर मनसे सत्तेमध्ये असतील, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. गेल्या आठवड्यात भाजपचे दोन्ही नेते आशिष शेलार व प्रसाद लाड यांनी मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका मांडली होती. आशिष शेलार म्हणाले की, “अमित ठाकरे यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी बोलणार आहे. एक वेगळ्या पद्धतीचे महाराष्ट्राच्या संस्कृतीला एका अर्थाने जपता येईल असं नातं आपण दाखवलं पाहिजे.”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले की, अमित ठाकरे हा आमच्या कुटुंबातील मुलगा आहे. तो पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. अमित ठाकरे राज ठाकरेंचा मुलगा असला तरी आम्ही त्याला आमच्या मुलासारखाच समजतो आणि या निवडणुकीत आम्ही राज ठाकरे यांना मदत करावी यावर ठाम आहोत.