शिवसेनेकडून मंत्रिमंडळात मोठे बदल दिसणार; ३ प्रमुख गोष्टींचा विचार करुन देणार मंत्रिपद

मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी ५ नोव्हेंबर ला आझाद मैदानावर संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. महायुतीच्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून देशभरातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, दिग्गज नेते, कलाकार, खेळाडूंसह कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर आता मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यानंतर मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावं, यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
मंत्रिमंडळात शिवसेनेकडून यंदा मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे कठोर निकष लावून मंत्रिपदाची माळ गळ्यात घालणार असल्याचं सूत्रांच्या माहितीनूसार समोर आलं आहे. पक्ष संघटना वाढवणारे आणि जे पात्र असतील त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे. शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी योगदान काय?, याचा विचार मंत्रिपद देताना केला जाणार आहे. निवडणुकीच्या प्रचारात किती साथ दिली याचा विचारसुद्धा केला जाणार आहे. तसेच ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर मंत्रिपद दिलं जाणार नाही, अशीही माहिती समोर आली आहे.
कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार या सगळ्या संदर्भातला निर्णय एकनाथ शिंदे घेणार आहेत. आमच्या पक्षाला कुठले मंत्रिपद हवे आहे. त्यासंदर्भात सुद्धा एकनाथ शिंदेच ठरवतील, असं उदय सामंत यांनी सांगितले. एकनाथ शिंदे कुठेही नाराज नाहीत, फक्त आमच्या विरोधकांनी तयार केलेल्या बातम्या आहेत. ज्यांनी मागच्या पाच दिवसांमध्ये दोनदा पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, भाजप जो कोणी चेहरा देईल तो मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याला आमचा पाठिंबा असेल. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज अशा बातम्या कारण नसताना पसरवल्या जातात, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. आम्हाला जे हवेत असे योग्य मंत्रिपद मिळतील आणि त्याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. मी जरी पक्षाच्या बैठकांमध्ये उपस्थित असतो तरी मंत्रिपदाबाबत निर्णय हे एकनाथ शिंदेच घेतात. कुणाला कोणते मंत्रिपद हवे. त्या सगळ्यासंदर्भात चर्चा सुरू आहे आणि लवकरच याबाबत निर्णय होऊन समोर येईल, असं उदय सामंत यांनी सांगितले.