राजकारण

खातेवाटपानंतर मंत्रिपद न मिळालेल्या इच्छुकांचे डोळे आता पालकमंत्रिपदाकडे

मुंबई : राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले आहे. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अनेकांचा शपथविधी सोहळाही पार पडला. पण, महायुतीतील भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये खातेवाटपावरून एकमत होत नव्हते. मात्र, या खातेवाटपावर एकमत होऊन वाटपही झाले आहे. पण, मंत्रिपद न मिळालेल्या इच्छुकांचे डोळे आता पालकमंत्रिपदाकडे लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रखडलेला विस्तार नुकताच पार पडला. त्यानंतर रखडलेले खातेवाटप शनिवारी रात्री जाहीर करण्यात आले. महायुतीत रायगड आणि छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते. तसेच मुंबईचे पालकमंत्रिपद मिळावे यासाठीही लॉबिंग सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आगामी काळात मनपा निवडणुका आहेत. यातच शिवसेना नेते संजय शिरसाट यांनीही आपणच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असणार असे म्हटले आहे. शहरात भाजपचे अतुल सावे हे देखील मंत्री आहेत. त्यामुळे आता कुणाची पालकमंत्रिपदी वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले हेच हवेत अशी मागणी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे. या मागणीला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. भाजपच्या आमदारांचाही या मागणीला पाठिंबा असल्याचा दावा शिवसेना आमदारांकडून यावेळी करण्यात आला. आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद मिळू नये यासाठी शिवसेना आमदारांनी प्रयत्न सुरू केल्याचे यावरून दिसून येत आहे.

रायगडच्या पालकमंत्रिपदावर आमचा दावा असणार आहे. त्याची काही काळजी करू नका ते देखील होईल, असे सूचक विधान शिवसेना नेते व मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. यामुळे आता रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन गोगावले व तटकरे यांच्यात पुन्हा वाद बघायला मिळणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कन्या आणि महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे आग्रही आहेत.

महायुतीतील भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या तीन नेत्यांना महत्त्वाची खाती देण्यात आली आहे. सत्तास्थापनेवेळी एकनाथ शिंदे यांनी गृहखात्यावर दावा केला होता. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. कारण, आता झालेल्या खातेवाटपात त्याचा उल्लेख नाही. त्यामुळे भाजपने हे खाते त्यांच्याकडे ठेवल्याचे दिसत आहे. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे नगर विकास तर अजित पवार यांच्याकडे अर्थखाते देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button